विरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला

विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा अनेकांना टोला

Updated: Feb 8, 2021, 01:29 PM IST
विरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला. खास करुन त्यांनी कृषी कायद्याबाबतही विरोधकांना उत्तर दिलं. पीएम मोदी यांनी म्हटलं की, शेतकरी आणि शेतकरी यांच्याच चर्चेचा मार्ग अजूनही बंद झालेला नाही. कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. नवे कृषी कायदे देशात मोठा बदल आणतील. कायदा लागू झाला म्हणजे असं नाही की, परत काहीच बदलता येणार नाही. भविष्यात कोणतीही कमी दिसली तर त्यात सुधारणा केली जाईल. MSP ला कोणीही संपवत नाहीये. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्यासाठी आवाहन केलं.

विरोधकांचा यू-टर्न?

विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'शरद पवार, काँग्रेस आणि प्रत्येक सरकारने कृषी कायद्यावर टीका केली. पण मी हैराण यासाठी आहे की, अचानक यूटर्न कसा घेतला. तुम्ही आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली असती. पण पण सोबत शेतकऱ्यांना हे देखील सांगितलं असतं की, बदल देखील आवश्यक आहे. ज्यामुळे देश पुढे गेला असता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना त्यांचं माल विकण्याचं स्वातंत्र्य आणि भारताला एक कृषी बाजार देण्यासाठी उद्देश व्यक्त केला होता. ते काम आज आम्ही करत आहोत. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की मनमोहन सिंग यांनी जे म्हटलं ते आज मोदीला करावं लागतं आहे.'

पीएम मोदींनी पुढे म्हटलं की, भारत अस्थिर, अशांत रहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या लोकांना ओळखण्याची आवश्यकता आहे. आपण हे विसरुन चालणार नाही की, जेव्हा फाळणी झाली तेव्हा सर्वात जास्त नुकसान पंजाबचं झालं. 1984 मध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा पंजाबला अश्रृ वाहावे लागले, आज काही लोकं पंजाबमधील सीख बांधवांना चुकीच्या गोष्ट सांगत आहे. या देशाला सीख बांधवांचा अभिमान आहे. काही लोकं त्यांची दिशा भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे कधीच देशाचं भलं होणार नाही.'

'मागील काही दिवसांपासून देशात एक नवी जमात तयार झाली आह आंदोलनजीवी'. वकील, विद्यार्थी, मजूर यांच्या आंदोलनात हे दिसतात. ही एक टोळी आहे. जे आंदोलनाशिवाय राहू शकत नाहीत आणि आंदोलनाने जगण्यासाठी मार्ग शोधत असतात.'