close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमोल यादव यांच्या 'स्वदेशी' विमानाला खुद्द पंतप्रधान मोदींनी सोपवले पंख!

गेल्या अनेक वर्षांपासून अमोल यादव उड्डाणाच्या परवान्यासाठी डीजीसीएचे उंबरठे झिजवत होते

Updated: Oct 20, 2019, 08:28 PM IST
अमोल यादव यांच्या 'स्वदेशी' विमानाला खुद्द पंतप्रधान मोदींनी सोपवले पंख!

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : अखेर अमोल यादव यांच्या विमानाच्या उड्डाणाला 'डीजीसीए'कडून परवानगी देण्यात आलीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमोल यादव यांना परवानगीचं पत्र सुपुर्द करण्यात आलं. मराठमोळे तरुण कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाला अखेर उड्डाणाचा परवाना (Permit to Fly) मिळालाय. याबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज अमोल यांना सुपूर्द केले. गेल्या अनेक वर्षांपासून ते उड्डाणाच्या परवान्यासाठी डीजीसीएचे उंबरठे झिजवत होते. अखेर मागील दोन महिन्यात डीजीसीएने याबाबत कार्यवाही सुरू केली. डीजीसीए पथकानं यादव यांनी तयार केलेल्या पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाची धुळे विमानतळावर येऊन पाहणी केली. या पाहणीनंतर अमोल यांना त्यांनी तयार केलेले सहा आसनी विमान उडवण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र पंरप्रधान नरेंद मोदी यांनी आज अमोल यांना सुपूर्द केले. अमोल यांची ही कामगिरी 'झी २४ तास'नं सर्वप्रथम समोर आणली होती. तसंच त्यांना परवाना मिळवण्यासाठीही 'झी २४ तास'नं पाठपुरावा केला होता. 


स्वदेशी विमान

विशेष म्हणजे अमोल यांनी जागेच्या अडचणीमुळे मुंबईतील चारकोप इथल्या इमारतीच्या गच्चीवर हे विमान तयार केलं आहे. आता १४ दिवसांच्या चाचणीनंतर अमोल यांचे विमान उड्डाणासाठी सज्ज होणार आहे.

अमोल यांनी बनवलेले पहिले भारतीय बनावटीचे विमान जेव्हा २०१६ साली 'मेक इन इंडिया'मध्ये प्रदर्शित करण्यात आले तेव्हा त्यांचा परिचय सगळ्यांना झाला. त्यांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. सामान्य माणसांपासून ते मुख्यमंत्र्यांसह राज्यातील आणि देशातील अनेक मंत्र्यांनी अमोल यांच्या या कामाबद्दल शाबासकीची थाप दिली. इतकंच नाही तर खुद्द राष्ट्रपतींकडूनदेखील अमोल यादव यांचं कौतुक झालं होतं. 


नरेंद्र मोदी आणि अमोल यादव

उल्लेखनीय म्हणजे, अमोल यादव यांनी आपल्या विमानाला VT-NMD हे नाव दिलं आहे. या नावातील NMD चा अर्थ ‘नरेंद्र मोदी देवेंद्र’ असा आहे. भारतातील विमानं VT ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते.