अजमेर दर्ग्यातील उरुसासाठी नरेंद्र मोदींनी 'या' मंत्र्याकरवी पाठवली चादर

नरेंद्र मोदी यांनी भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Mar 6, 2019, 01:00 PM IST
अजमेर दर्ग्यातील उरुसासाठी नरेंद्र मोदींनी 'या' मंत्र्याकरवी पाठवली चादर title=

अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बुधवारी अजमेर दर्ग्यातील वार्षिक उरुसासाठी चादर पाठवण्यात आली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे मोदींतर्फे ही चादर घेऊन दर्ग्यात हजर झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा संदेशही वाचून दाखवला. या उरूसासाठी देशभरातून लाखो भाविक अजमेरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. ७ मार्चला चंद्रदर्शन झाल्यानंतर या उरुसाला सुरुवात होईल. मुस्लीम समाजात या उरुसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्याकडून दर्ग्यात चादर पाठवण्यात आली. यावेळी मोदींनी येथील भक्तांसाठी संदेशही पाठवला होता. यामध्ये त्यांनी भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशात सद्भाव आणि शांतीचे वातावरण कायम राहावे, अशी प्रार्थना केली. 

नरेंद्र मोदी यांनी उरुसासाठी पाठवलेली चादर घेऊन मुख्तार अब्बास नक्वी दिल्लीहून हवाईमार्गे किशनगढ विमानतळावर पोहोचले. यानंतर साधारण १०.३० च्या सुमारास ते अजमेर दर्ग्यात दाखल झाले. यानंतर नक्वी यांनी पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेली चादर पवित्र चबुतऱ्यावर चढवली. या उरुसासाठी रेल्वेकडून १० व १६ मार्चला विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.