नरेंद्र मोदी दहशतवादी वाटतात; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

देशाचा पंतप्रधान कसा नसावा, याचे उदाहरण म्हणून मोदींकडे पाहता येईल.

Updated: Mar 10, 2019, 01:22 PM IST
नरेंद्र मोदी दहशतवादी वाटतात; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली title=

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी काय करतील, याचा नेम नसल्याने जनतेला त्यांची भीती वाटते. त्यामुळे लोकांना ते दहशतवाद्याप्रमाणे वाटतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी केले आहे. तेलंगणा येथील जाहीर सभेत बोलताना विजयाशांती यांची जीभ भलतीच घसरली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी कधीही बॉम्ब टाकतील की काय, अशी भीती नागरिकांना वाटत असते. लोक दहशतवाद्यांइतकेच त्यांना घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाचा पंतप्रधान कसा नसावा, याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल, असेही विजयाशांती यांनी म्हटले. साहजिकच त्यांच्या या विधानावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. 

विशेष म्हणजे या प्रचारसभेला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनीही मोदींवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, मोदी दोन भारत निर्माण करत आहेत. एक गरिबांचा आणि दुसरा अंबानी यांच्यासारख्या श्रीमंत व धनाढ्य लोकांचा. पहिल्या भारतात शेतकरी मदतीची याचना करतात, कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसऱ्या भारतात श्रीमंत लोकांकडे स्वत:ची विमाने आहेत, आपली प्रत्येक इच्छा ते पूर्ण करु शकतात, असे राहुल यांनी सांगितले.