कोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन

PM Narendra modi in Rajysabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.

Updated: Feb 8, 2022, 01:19 PM IST
कोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

पीएम मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, काँग्रेस पक्षाला शहरी नक्षलवाद्यांनी हायजॅक केले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. देश बदलतोय आणि इतिहास बदलला जात असल्याचं ते सांगत आहेत. आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो की फक्त एक कुटुंब म्हणजे इतिहास नाही.

 

कोरोना महामारीच्या काळात देश एकत्र

आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, कोरोना योद्ध्यांनी ज्या एकजुटीने कोरोना महामारीच्या काळात मानवतेची अखंड सेवा केली त्याचे जगभरातून कौतुक होत आहे.

कोरोनाच्या काळात लाखो घरांमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांच्या सरकारने घेतली.

पक्के घर देण्याचे वचन : PM मोदी

PM मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात देशाला बळकटी देत ​​असताना, त्यांच्या सरकारने देशातील गरिबांना पक्की घरे देण्याची योजना अखंड सुरू ठेवली. 

काँग्रेसने देशाची दुर्दशा केली: PM मोदी

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर खरपूस समाचार घेतला आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांना देशातील विक्रमी लसीकरण ही मोठी गोष्ट वाटत नाही.

ते म्हणाले की, 2013 पर्यंत काँग्रेस पक्षाने देशाची दुर्दशा केली. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना देशात होत असलेले बदल दिसत नाहीत.

परिवारवादामुळे देशाचे नुकसान 

आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाला आरसा दाखवत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने परिवर्तनाची सुरुवात करावी. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला परिवारवादाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. 
काही लोकांचा असा विश्वास आहे की भारताचा जन्म 1947 मध्ये झाला, या विचारसरणीमुळे समस्या निर्माण होतात आणि ज्यांना 50 वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्यांनी काहीच केले नाही.

1975 मध्ये लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. काँग्रेसने घराणेशाहीशिवाय कोणताही विचार विचार केला नाही. भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाहीवादी पक्षांकडून आहे. 

कॉंग्रेस नसती तर... : मोदी यांचा घणाघात

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार कॉंग्रेस नसती तर काश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले नसते. देशात लोकशाहीची हत्या झाली नसती.

कॉंग्रेस नसती तर देशात जातीवादाची मुळे इतकी घट्ट झाली नसती. कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता. कॉंग्रेस नसती तर पंजाबमध्ये दहशतवाद जन्माला आला नसता. असा घणाघात मोदी यांनी केला.

काँग्रेस सत्तेत असताना देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधात असताना देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.