'पाकिस्तान रडत आहे, त्यांना काँग्रेसच्या शेहजादाला....',PM नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, राहुल गांधींना केलं लक्ष्य

LokSabha Election: काँग्रेस पाकिस्तानचा चाहता आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) शेहजादा असा उल्लेख करत टोलाही लगावला.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2024, 01:14 PM IST
'पाकिस्तान रडत आहे, त्यांना काँग्रेसच्या शेहजादाला....',PM नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, राहुल गांधींना केलं लक्ष्य title=

LokSabha Election: पाकिस्तानमधील नेते चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचं कौतुक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानी नेत्यांना काँग्रेसच्या शेहजादाला भारताचं पंतप्रधान करायचं आहे असा दावा त्यांनी केला आहे. गुजरातच्या आनंद येथे आयोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, "काँग्रेस येथे मरणाला टेकली असताना पाकिस्तान रडत आहे. पाकिस्ताने नेत्यांना काँग्रेसच्या शेहजादाला भारताचं पंतप्रधान करायचं आहे". काँग्रेस पाकिस्तानचा चाहता असाही आरोप त्यांनी केला आहे. 

"तुम्ही सर्व योगायोग पाहा. काँग्रेस भारतात दुबळी होऊ लागली आहे आणि पाकिस्तानी नेते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तान प्रिन्स पंतप्रधान करण्यासाठी फार उत्सुक आहेत आणि काँग्रेस पाकिस्तानचा चाहता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. चौधरी फवाद हुसेन यांनी राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते भाजपा आणि नरेंद्र मोदींवर टीका करत होते.

 
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत राहुल गांधी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. एडिट केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी राममंदिराच्या उद्घाटनावर बोलताना भाजप सरकारवर गरीब आणि तरुणांच्या हिताला बगल दिल्याचा आरोप करत आहेत.

चौधरी फवाद हुसेन यांच्या पोस्टवरुन बुधवारी भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "इम्रान खान मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलेले फवाद हुसेन हे राहुल गांधींचा प्रचार करत आहेत. काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे का?" पुढे म्हणाले की, "मुस्लिम लीगची छाप असणाऱ्या काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पाकिस्तानशी असलेले संबंध अधिक स्पष्ट होत आहेत".

"काँग्रेसचे शहजादे राज्यघटना घेऊन नाचत आहेत. पण 75 वर्षे हिंदुस्थानच्या सर्व भागांमध्ये हे लागू केलं नाही. काश्मीरमध्ये संविधान लागू झाले नाही, जिथे कलम 370 हे भिंतीप्रमाणे आम्ही पाडलं," असंही मोदी म्हणाले. भारताला विकसित करण्यासाटी आपण 2047 पर्यंत 24x7 काम करु असा शब्दही त्यांनी दिला.