दावोस : दावोस शहरात होत असलेल्या वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारतीय पंतप्रधानांनी सामील होण्याची २० वर्षांतली ही पहिली वेळ आहे.
भारतीय वेळेनुसार काल रात्री उशिरा एका विशेष वेलकम पार्टीचं आयोजन करण्यात आलं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय आणि आंतराष्ट्रीय उद्योग जगतातल्या अनेकांनी आवर्जून सहभाग घेतला.
मोदींनी स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींचीही भेट घेतली. आज दावोसच्या आर्थिक परिषदेच्या मुख्य सत्रात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मोदींचं भाषण होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्तानं गेल्या साडे तीन वर्षात भारतात झालेल्या आर्थिक प्रगतीविषयी जगातील दिग्गज उद्योगपतींना माहिती देतील.
त्याचप्रमाणे यानिमित्तानं दावोसमध्ये आलेल्या जगभरातल्या बड्या कंपन्यांनांच्या सीईओंसोबत पंतप्रधान विशेष चर्चा करणार आहेत.
गेल्या वर्षी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या यादीत भारतानं ४२ स्थानांची उडी घेतलीय. त्यामुळे भारतातील भविष्यातील गुंतवणूक किती फायदेशीर ठरू शकते, याविषयी सीईओंच्या बैठकीत मुद्दे मांडले जातील.