कोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोनाची लस कधी घेणार वाचा सविस्तर 

Updated: Jan 21, 2021, 02:15 PM IST
कोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: देशभरात पहिल्या टप्प्यातील कोरोनाचं लसीकरण सुरू आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इतर देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी कोरोनाची लस घेतली आता पंतप्रधान मोदी कधी घेणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. याचं उत्तर आता कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी देणार आहेत. 

देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लसीकरण मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. इतकच नाही तर कोरोनाची लस देखील घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा देखील समावेश असणार आहे.  

पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम कधी सुरू होणार याची तारीख अद्याप समोर आली नाही.  

कोरोना लसीकरणावरून विरोधकांनी घेरलं 

इतर देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी सर्वात पहिल्यांदा लस घेतली. ही लस सुरक्षीत आहे असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी लस घ्यावी त्यानंतर आम्ही घेऊ असा सूर विरोधकांनी लावून धरला होता. लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांच्या विरोधकांनी लस घेण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना घेरलं होतं.  

पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना केलं आवाहन 

कोरोना वॅक्सीन ड्राइव्ह लाँच करण्याआधी सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि नेत्यांसोबत मोदी यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. याशिवाय मंत्र्यांनी लाइन तोडून कोरोनाची लस घेऊ नये असं आवाहन ही पंतप्रधान मोदींनी केलं आहे.