लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी हे सगळ्यात कमकुवत आणि भित्रे पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला. यापूर्वी मोदींना दुर्योधनाची उपमा देऊन त्यांनी टीका केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी १२ जानेवारीला मतदान होणार आहे. या सहाव्या टप्प्यात ७ राज्यात ५९ जागांवर मतदान होतं आहे. या टप्प्यातील ५९ जागांपैकी ४६ जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचं आव्हान भाजपपुढे असणार आहे. सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात आणि यूपीची हवा पूर्वांचल ठरवते. सहाव्या टप्प्यात ज्या १४ जागांवर मतदान होतंय त्यातल्या १३ जागा एनडीएकडे होत्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारावर जोर असणार आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसनेते दिग्विजय सिंग यांची लढत भाजपा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी होते आहे. गुणा मतदारसंघात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हरियाणातील १० पैकी ७ जागा भाजपानं गेल्या वेळी जिंकल्या होत्या.
अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय. पश्चिम बंगालमध्ये भाजपानं ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं केलंय. तर दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजपा, आप आणि काँग्रेस अशी लढत आहे.