Crime News : पंजाबच्या सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसोबतच ड्रग्जचीसुद्धा (Drugs) मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर आलं आहे. सीमा सुरक्षा दलाकडून (BSF) हा सगळा प्रकार रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही शेजारील देश अजूनही वठणीवर येताना दिसत नाहीये. त्यामुळे बीएसएफकडून कठोर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईत बीएसएफने चुकून पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) अधिकाऱ्यांना पकडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली बीएसएफने दोन पोलिसांना अटक केली होती. सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे हेरॉइन तस्करीच्या आरोपाखाली दोन पोलीस अधिकाऱ्यांना फिरोजपूरच्या जल्लोस मोर भागात पकडलं होतं. गावकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली होती. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. बीएसएफच्या जवानांनी गैरसमजातून पोलीस अधिकाऱ्यांना पकडल्याची माहिती पंजाब पोलिसांना दिली.
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांकडे काही गावकरी त्यांच्याकडे चौकशी करताना दिसत होते. त्यावेळी पोलीस अधिकारी तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफने पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर, पंजाब पोलिसांनी ट्विट करत सांगितले की हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. पंजाब पोलिसांच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. "जालंधर ग्रामीण भागात तैनात असलेले दोन पोलीस उपनिरीक्षक निशान सिंग आणि त्यांचे सहकारी गुरविंदर राम छाप्यानंतर हेरॉइन जप्त करण्यासाठी फिरोजपूरला गेले होते. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला," अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली.
गुरुवारी रात्री पंजाबच्या हुसैनीवाला सीमेला लागून असलेल्या गावात बीएसएफने गावकऱ्यांच्या मदतीने कारमधून दोन पंजाब पोलिस कर्मचाऱ्यांना हेरॉईनसह पकडले होते. बीएसएफने कारच्या बोनेटमधून हेरॉइनची दोन पाकिटे जप्त केली होती. त्यानंतर जालंधरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुखविंदर सिंग भुल्लर यांनी सांगितले की त्यांनी जोगा आणि मलकित सिंग या तस्करांना अटक केली होती. त्यांच्या सांगण्यावरून हे दोन्ही पोलीस अधिकारी हेरॉईन जप्त करण्यासाठी गावात गेले होते. त्यावेळी गैरसमजातून गावकऱ्यांनी पोलिसांना पकडलं होतं.
तस्करांच्या साथीदारांनी हेरॉईन घेऊन पळ काढू नये म्हणू ते कारच्या डिक्कीमध्ये लपवण्यात आले होते. कारण पोलीस अधिकारी तिथे जात असल्याची माहिती तस्करांना मिळाली होती. जालंधर पोलिसांनी पकडलेले तस्कर जोगा आणि मलकित हे पाकिस्तानातून 50 किलो हेरॉईन घेऊन भारतात आले होते. त्यांच्याकडे हेरॉईनची मोठी खेप होती. दुसरीकडे, पोलीस अधिकारी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. मात्र पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊन पोलीस अधिकाऱ्यांना तिथून सोडवलं.