लुधियाना : पंजाब राज्यातील लुधियाना येथून एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. गावातील एका प्रेमी युगुलाने घरातून पळून जाऊन लग्न केले. या घटनेनंतर गावातील ग्रामपंचायतीने थेट प्रेमविवाहावरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दोराहा शरहातील चंकोईन खुर्द गावातील हा प्रकार आहे.
दरम्यान, या युगुलाच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांच्या विचाराधिन असल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक गुरूद्वारा कमेटी आणि गावातील स्पोर्ट्स क्लब आदींकडून २९ एप्रिलला या प्रकरणावर विचार करण्यासाठी एक बैठक झाली. यात पळून जाऊन लग्न करणाऱ्या युगुलाच्या कुटुंबियांना बहिष्कृत करण्याबाबतचा प्रस्ताव पारीत केला.
या प्रस्तावामध्ये म्हटले आहे की, जर एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या इच्छेनुसार लग्न केले तर, गावातातून त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले जाईल. जर त्यांना गावातील दुसऱ्या एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मदत करते आहे असे निदर्शनास आले तर, त्या व्यक्ती किंवा कुटुंबियांनाही बहिष्कृत केले जाईल. बहिष्कृत केल्या गेलेल्या कोणत्याही कुटुंबाला गावातील कोणताही दुकानदार वस्तू विकणार नाही आणि त्यांच्याकडून खरेदीही करणार नाही. ते लोक गावची सार्वजनिक जमीनही वापरू शकणार नाहीत. तसेच, त्यांना ग्रामपंचायत किंवा गुरूद्वाराकडून कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जाणार नाही. गावातील प्रमुख ठिकाणी या निर्णयाची प्रत चिकटवण्यात आली आहे.
दरम्यान, गावातील सरपंचाचे म्हणने असे की, ही काही हुकुमशाही नव्हे. पण, हा गावाने घेतलेला निर्णय आहे.