अहमदाबाद : 'ओखी' वादळाचा फटका गुजरातच्या रणधुमाळीलाही बसलाय. यामुळे, अनेक राजकीय सभा रद्द करण्यात आल्यात.
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात निवडणूक प्रचारासाठीच्या सभा ओखी चक्रीवादळामुळं रद्द करण्यात आल्यात. राहुल गांधी दोन दिवसात आठ प्रचारसभा घेणार होते. मात्र पावसामुळं त्या रद्द करण्यात आल्यात. त्याशिवाय येत्या ७ आणि ८ तारखेला होणाऱ्या त्यांच्या सभाही रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिलीय.
काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातमध्ये येणार होते. त्यामुळं त्यांच्या भाषणांकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या या सभा रद्द झाल्यानं पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रंगत कमी झालीय.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांच्या भावनगर आणि अमरेली या तिन्ही जिल्ह्यांतील सभा रद्द करण्यात आल्यात... तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची सुरतमधली सभा रद्द झाल्याचं समजतंय.