नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. 'चौकीदार चोर है' या वक्यव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी न्यायालयाची माफी मागीतली. यासंदर्भात सोमावारपर्यंत नवे प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राहुल गांधी यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.
राफेल खरेदीसंदर्भात माध्यमातून उघड झालेली कागदपत्रे ही पुरावा म्हणून विचारात घेतली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने फेरयाचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले होते. या आदेशाचा आधार घेत राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयानेही आता ‘चौकीदार चोर आहे’ असे म्हटल्याचे विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी स्वत:ची विधाने घालणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे कारण देत भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती.
मंगळवारी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्रातील शब्दप्रयोगांवर नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांच्यावतीने दिलगिरी व्यक्त करताना अनेक शब्दांचा कंसात वापर करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. राहुल गांधी यांनी सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्रासाठी माफी मागितली.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा वादात सापडला असताना, काँग्रेसच्या सरचिटणीस आणि राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वाड्रा या आपल्या भावाच्या मदतीला धावून आल्या आहेत. राहुल गांधी भारतीयच आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. राहुल भारतात जन्माला आले इथेच वाढले. त्यामुळे हा विनाकारण वाद उकरला जात असल्याबद्दल प्रियंका यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले.