Priyanka Gandhi Slammed Modi: "तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर..."; भावाची खासदारी गेल्याने प्रियंका गांधींचा थेट मोदींवर हल्लाबोल

Priyanka Gandhi Slammed PM Modi: प्रियंका गांधी यांनी काही ट्वीट केले असून त्यांनी यामधून आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी गौतम अदानींबरोबरच निरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांचाही उल्लेख केला आहे.

Updated: Mar 24, 2023, 05:07 PM IST
Priyanka Gandhi Slammed Modi: "तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर..."; भावाची खासदारी गेल्याने प्रियंका गांधींचा थेट मोदींवर हल्लाबोल title=
Modi Rahul Gandhi Priyanka Gandhi

Priyanka Gandhi Slammed Modi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्यात आली आहे. 'मोदी अडनाव' प्रकरणामध्ये राहुल यांना सुरत कोर्टाने दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर 2013 मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राहुल यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर आता राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदींनी जेव्हा काश्मीरी पंडीतांचा अपमान केला तेव्हा त्यांची खासदारकी का रद्द करण्यात आली नाही असा प्रश्न प्रियंका गांधींनी विचारला आहे. तसेच गौतम अदानींचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केल्यावर मोदी एवढे का संतापले असा प्रश्न प्रियंका यांनी विचारला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काहीही केलं तरी आम्ही लढत राहू असंही प्रियंका यांनी म्हटलं आहे.

मोदीजी, तेव्हा तुमच्यावर कारवाई झाली नाही

"नरेंद्र मोदीजी तुमच्या चमच्यांनी एका शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटलं. तुमच्या एका मुख्यमंत्र्याने राहुल गांधींचे वडील कोण आहेत असा प्रश्न विचारला. काश्मीरी पंडितांच्या परंपरांचा पलन करताना एका मुलाचा, पित्याचा मृत्यू झाल्यानंतर तो जबाबदारी स्वीकारतो. आपल्या कुटुंबांची परंपरा कायम ठेवतो. संपूर्ण संसदेसमोर तुम्ही संपूर्ण कुटुंब आणि काश्मीरी पंडितांचा अपमान करताना, नेहरु नाव का नाही ठेवत. मात्र तुम्हाला कोणत्याही न्यायाधिशाने दोन वर्षांची शिक्षा दिली नाही. तुमची खासदारकी रद्द करण्यात आली नाही," अशी आठवण प्रियंका गांधींनी मोदींना टॅग करत करुन दिली.

नक्की वाचा >> Rahul Gandhi Disqualified: 10 वर्षांपूर्वी 'तो' कागद फाडला नसता तर आज राहुल गांधींची खासदारकी वाचली असती

तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर...

"राहुलने एका खऱ्या देशभक्तांप्रमाणे अडानींकडून होणाऱ्या लुटीसंदर्भात प्रश्न विचारले. नीरव मोदी, मेहूल चौक्सी यांच्याविरोधात प्रश्न विचारले. तुमचा मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील महान जनतेपेक्षा अधिक मोठा झाला आहे का? ज्यामुळे त्याच्या लुटीसंदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही एवढे चिडलात? तुम्ही माझ्या कुटुंबावर घराणेशाहीची टीका करता. समजून घ्या या कुटुंबाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त दिलं आहे. हेच स्वातंत्र्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात. या कुटुंबाने भारतीय जनतेचा आवाज कायमच मजबूत केला आणि अनेक पिढ्यांपासून सत्यासाठी संघर्ष केला आहे. आमच्या नसांमध्ये जे रक्त आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर, हुकूमशाहांसमोर आम्ही कधीच झुकत नाही आणि कधी झुकणार ही नाही. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करु शकता," असं थेट आव्हान प्रियंका गांधींनी दिलं आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर त्यांना शिक्षेची 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील 6 वर्ष खासदारकीची निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काँग्रेस पुढील वाटचाल कशी करते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.