काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल गांधी निवांत; मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहिला चित्रपट

काँग्रेसपुढे यक्षप्रश्न उभा राहिला असला तरी स्वत: राहुल मात्र निवांत असल्याचे दिसत आहे.

Updated: Jul 4, 2019, 10:45 PM IST
काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल गांधी निवांत; मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहिला चित्रपट title=

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत आहेत. राहुल यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसपुढे यक्षप्रश्न उभा राहिला असला तरी स्वत: राहुल मात्र निवांत असल्याचे दिसत आहे. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर राहुल मोकळ्या वेळेचा पुरेपूर आनंद घेत आहेत. ते गुरुवारी दिल्लीच्या 'पीव्हीआर'मध्ये आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट पाहायला गेले होते. यावेळी एका प्रेक्षकाने त्यांचा व्हीडिओ चित्रित केला. या व्हीडिओत राहुल गांधी आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावरुन एकूणच राहुल गांधी सध्या निवांत मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. 

राहुल गांधी पळपुटे, मैदानात उभे राहून लढण्याऐवजी पळ काढला- सुब्रमण्यम स्वामी

निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितले आहे. बुधवारीच त्यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत ट्विटरवर प्रसिद्ध केली होती. मी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. पक्षाच्या चांगल्या भविष्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. त्यामुळे अध्यक्ष म्हणून मी स्वत:ची जबाबदारी टाळून इतरांना जाब विचारणे चुकीचे ठरेल, असे राहुल यांनी राजीनाम्यात म्हटले होते. 

त्यामुळे आता काँग्रेसच्या कार्यकारिणीकडून नव्या अध्यक्षाचा शोध घेतला जात आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचे डोळे काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाकडे लागले आहेत.