Weather Update: उत्तर भारतात गोठवणाऱ्या थंडीचे थेट परिणाम देशातील उर्वरित भागात पाहायला मिळाले. आता मात्र हीच (Winter) थंडी कुठच्या कुठे पळून गेली आहे. कारण, फेब्रुवारी महिना संपून मार्च उजाडलाही नाही तोच देशात तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येसुद्धा तापमान वाढू लगाण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पश्चिमी झंझावात हिमालयावरून जात असल्यामुळं आणि आणखी एक पश्चिमी झंझावात 26 फेब्रुवारीला हिमालयातील पर्वतरांगांच्या परिसरात पोहोचत असल्यामुळं या दोन्ही झंझावातांचे परिणाम तापमानवाढीमध्ये रुपांतरीत होताना दिसणार आहेत.
हिमाचल प्रदेश (Himachal Praesh), राजस्थान (Rajashtan), गुजरात (Gujrat) या राज्यांतील तापमानात 5 अंशांनी वाढ झालेली असतानाच आता हवामान विभागानं पूर्व आसाम, (Arunachal Pradesh) अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम (Sikkim) आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरी किनारी भागातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमालयातील काही पट्ट्यांमध्येसुद्धा पावसाच्या सरींसह तुरळक ठिकाणी बर्फवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सहसा प्रत्येक ऋतू चार महिने टिकतो असा अंदाज असतो. पण, यंदाचं वर्ष उन्हाळ्यासाठी अपवाद ठरू शकतो. कारण, मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर सुरु होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारीच्याच मध्यापासून जाणवण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये जिथं मराठवाडा आणि नजीकच्या पट्ट्यापासून उष्णतेच्या झळा तीव्र होताना दिसतात तिथेच यंदा कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटा स्थानिकांना हैराण करतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच काही भागांतील तापमान 37 - 39 अंशांवर पोहोचलं आहे. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्ये सकाळ आणि रात्रीच्या तापमानात 15 ते 20 अंशांचा फरकही नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन यंत्रणांद्वारे करण्यात येत आहे.
तापमानात सातत्यानं होणारे बदल पाहता येत्या काळात काही संसर्ग आणि विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढू शकतं अशी चिंता आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळं खोकला, सर्दी, ताप आल्यास काळजी घेत योग्य उपचार घेण्याची विचारणा करण्यात येत आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रदूषणाचं प्रमाणंही जास्त असल्यामुळं हवामानासोबतच आरोग्यावर त्याचेही परिणाम दिसून येतील ज्यामुळं नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय अवलंबात आणावेत असंही सांगण्यात येत आहे.