अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?

या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानात असल्याची माहिती समोर आलीय. 

Updated: Jul 12, 2021, 10:54 PM IST
अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?  title=

मुंबई : अयोध्येतलं राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येतीय. लखनऊत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर घातपाताचा मोठा कट उधळला गेलाय. त्यामुळं अयोध्येसह महत्वाच्या धार्मिक स्थळांवरील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आलीय. तसेच पोलिसही सतर्क झाले आहेत. सोबतच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Ram temple in Ayodhya is targeted on terrorists)

अयोध्येला छावणीचं स्वरूप 

लखनऊमधल्या काकोरीतून अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. हे दहशतवादी मोठ्या घातपाताची तयारी करत होते. सुत्रांच्या माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिर या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं.. त्यांच्याकडे सापडलेल्या नकाशांवरून त्यांचे नापाक मनसुबे स्पष्ट झालेत. 

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं मिनाज अहमद आणि मसिरूद्दीन अशी आहेत. त्यांच्याजवळून काही स्फोटकं जप्त करण्यात आलीयेत. या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानात असल्याची माहिती समोर आलीय. अयोध्येसह अनेक भागात आत्मघातकी स्फोट घडवण्याचा त्यांचा डाव होता. 
 
अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचं काम वेगानं सुरूंय. याठिकाणी मोठा घातपात झाला असता तर देशातील सामाजिक ऐक्य धोक्यात आलं असतं... दहशतवाद्यांनी याच उद्देशानं मोठा कट रचला होता. मात्र सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा कुटील डाव उधळला गेलाय. आता या दहशतवाद्यांकडे सापडलेले नकाशे आणि इतर माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी छापेमारी सुरू केलीय. जवळपास 12हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. आता या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील आका कोण होते? हे लवकरच स्पष्ट होईल.