Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.
या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहेत, अशा भाषेत रामदास कदम ठाकरेंना बोलले. आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा असे आव्हानही त्यांनी यावेळी केल. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक राहिले? कोकणामध्ये येऊन काय दाखवणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांची यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्यावरही टीका केली. 7 वेळा खासदारकी भोगली. 3-4 वेळा मंत्री झालात मग कोकणासाठी काय केलं? असा प्रश्न त्यांनी विचारला. पाऊस पडला की आळंबी उगवतात तसा निवडणुका आल्या की हा माणूस उगवतो असे ते अनंत गीतेंना उद्देशून म्हणाले.
उद्धव ठाकरे सध्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी अशा कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधीच निलेश राणे यांनी त्यांच्यावर टिका केली. आता कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या सभेतून विरोधकांना काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. सावंतवाडीपासून त्यांच्या दौ-याची सुरूवात होणार आहे.त्यानंतर कुडाळ, कणकवली मतदारसंघात दौरा सभा घेणार आहे. केसरकर आणि राणेंच्या मतदारसंघात आज ठाकरेंचा दौरा असून, केसरकर, राणेंवर निशाणा साधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधीच कुडाळमधील सभेला निलेश राणेंनी विरोध केला. ठाकरेंनी आपल्या सभेची जागा बदलावी असे ते म्हणाले. त्यावर ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंशी असलेले हाडवैर सर्वांनाच माहितीये. त्यामुळं कोकण दौ-यात राणेंचा समाचार घेण्याची शक्यता आहे.तसंच केसरकर शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरेंची सावंतवाडीत पहिलीच सभा होतेय...यामुळे सावंतवाडीच्या सभेतून केसरकरांवरही निशाणा साधण्याची शक्यता आहे. यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळमध्ये त्यांची दुसरी सभा होणार आहे, त्यानंतर सिंधुदूर्ग किल्ला आणि आंगणेवाडी देवीच्या दर्शनाला ठाकरे जाणार आहेत...संध्याकाळी भाजपचे आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा होणार आहे.