अंबानींचा थाट न्यारा; नातवाच्या वाढदिवसासाठी खास व्यवस्था, सर्वांपुढे मोठा आदर्श

 एका कोविड सुरक्षित वातावरणातच ही पार्टी होणार आहे. 

Updated: Dec 9, 2021, 04:38 PM IST
अंबानींचा थाट न्यारा; नातवाच्या वाढदिवसासाठी खास व्यवस्था, सर्वांपुढे मोठा आदर्श
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या नातवाचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या चिमुकल्याच्या वाढदिवसासाठी 100 ब्राह्मणांची उपस्थिती असणार आहे. पृथ्वीला आशीर्वाद देण्यासाठी ते हजर राहणार आहेत. जामनगरमध्ये हा संपूर्ण सोहळा साजरा केला जाणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार वाढदिवसासाठी 120 पाहुण्यांना खासगी विमानानं जामनगरपर्यंत नेण्यात येणार आहे. 

अतिशय ग्रँड अशा या वाढदिवस सोहळ्यामध्ये सचिन तेंडुलकरपासून, झहीर खान, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांची उपस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. 

नातवाच्या वाढदिवसाच्यानिमित्तानं अंबानी कुटुंबीय नजीकच्या गावात 50 हजार गावकऱ्यांमध्ये, गरजवंतांमध्ये अन्नदान करण्यात येणार आहे. 

अनाथआश्रमांमध्ये त्यांच्यातर्फे काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.   शिवाय देशातील 150 अनाथआश्रमांमध्ये अंबानींच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी पार्टीचं आयोजनही करण्यात येणार आहे. 

पृथ्वीच्या आईनं म्हणजेच अंबानींची सून, श्लोका हिनं आपल्या मुलासाठी खेळणी आणि प्ले एरिया नेदरलँड्सहून मागवले आहेत. एका कोविड सुरक्षित वातावरणातच ही पार्टी होणार आहे. 

इथं मेजवानी तयार करण्यासाठी थायलंडहून, इटली आणि इतर देशातील लोकं आली आहेत. ज्यामुळं त्यांना सक्तीच्या क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस झालेल्यांनाच या पार्टीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय 7 तारखेपासूनच पाहुण्यांच्या कोरोना चाचण्या घेण्याची व्यवस्था अंबानी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. अशा सूचनांचं एक पत्रकच पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. 

येताना कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नका, त्याऐवजी दान करण्यासाठीच्या गोष्टींमध्ये योगदान देण्याची विनंती संपूर्ण अंबानी कुटुंबानं केली आहे.