शरद पवारांच्या नातवाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

इतकंच जर वाटत असेल तर शिवसेनेने मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगून सरकारमधून बाहेर पडावे.

Updated: Dec 21, 2018, 08:37 AM IST
शरद पवारांच्या नातवाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले... title=

पंढरपूर: शिवसेना एकीकडे भाजप सरकार जुमलेबाजी करत असल्याचे सांगते. मात्र, दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्ता उपभोगते, या वर्तनाला काय म्हणणार, असा सवाल शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उपस्थित केला. पंढरपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या बैठकीसाठी आले होते. तेव्हा आदित्य ठाकरेंनी भविष्यात जुमलेबाजी सरकार येऊ नये, असे साकडे विठ्ठलाला घातले होते. यावरूनच रोहित पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला. 

रोहित पवार यांनी म्हटले की, सत्तेत राहूनही तुम्ही जुमलेबाजीचं सरकार असल्याची टीका करता. इतकंच जर वाटत असेल तर शिवसेनेने मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगून सरकारमधून बाहेर पडावे. तरच तुमच्या बोलण्यात तथ्य असल्याचे मानता येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

बाळासाहेब हुशार होते पण... ; 'त्या' अग्रलेखावरून रोहित पवारांची उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका

यावेळी रोहित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात सूचक भाष्यही केले. सध्या मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यामुळे तुर्तास पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे, हेच माझे लक्ष्य आहे. परंतु, वरिष्ठांनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढवण्यासाठीही तयार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

रोहित पवार हे शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पूत्र आहेत. ते सध्या बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. शरद पवार यांच्यासह ते अनेक कार्यक्रमांनाही हजेरी लावतात. एकूणच ते राजकारणात बरेच सक्रिय आहेत. त्यामुळे आता भविष्यात पवार आणि ठाकरे घराण्याच्या नव्या पिढीत वाकयुद्ध रंगणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.