#भागवत_माफी_मांगो Trend मध्ये... Mohan Bhagwat यांच्याविरोधात का व्यक्त केला जातोय संताप?

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पंडिंतांचा उल्लेख करत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काही पंडित शास्त्रांचा आधार घेत खोटं बोलतात असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.   

Updated: Feb 6, 2023, 12:25 PM IST
#भागवत_माफी_मांगो Trend मध्ये... Mohan Bhagwat यांच्याविरोधात का व्यक्त केला जातोय संताप? title=

Mohan Bhagwat Big Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) सध्या ट्विटरवर (Twitter) चर्चेत आहेत. #भागवत_माफी_मांगो (#Bhagwat Mafi Mango) असा ट्रेंडच ट्विटरवर सुरु आहे. मोहन भागवत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असून, नेटकरी व्यक्त होत आहेत. मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेलं विधान यामागचं कारण ठरत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी काही पंडित (Pandit) शास्त्रांचा आधार घेत खोटं बोलतात असं विधान केलं आहे. यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. 

मोहन भागवत रवींद्र नाटय़ मंदिरात (Ravindra Natya Mandir) रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज (Saint Shiromani Rohidas Maharaj) जयंती कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोणतंही काम लहान किंवा मोठे नसते. कामाच्या स्वरुपाचा विचार न करता त्याचा आदर करण्याचे आवाहन केलं. "व्यक्तीचे नाव, क्षमता आणि प्रतिष्ठा काहीही असो, प्रत्येकजण समान असतो आणि त्यात कोणतेही मतभेद नसतात," असं मोहन भागवत म्हणाले.

"देव हेच शाश्वत सत्य आहे. नाव, क्षमता, प्रतिष्ठा काहीही असो, प्रत्येकजण समान असून कोणताही भेदभाव नाही. काही पंडित शास्त्रांच्या आधारे जे बोलतात ते खोटं आहे," असं मोहन भागवत यांनी सांगितलं. ""जाती श्रेष्ठत्वाच्या भ्रमाने आपली दिशाभूल केली जात आहे आणि हा भ्रम बाजूला ठेवला पाहिजे," असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. 

मोहन भागवत यांनी यावेळी देशात चैतन्य आणि विवेक समान असून, फक्त मतं वेगळी आहेत असं सांगितलं. आरएसएस प्रमुखांनी सांगितलं की, संत रोहिदास यांची उंची तुलसीदास, कबीर आणि सूरदास यांच्यापेक्षा मोठी आहे, म्हणूनच त्यांना संत शिरोमणी मानले जाते.

"आपल्या धर्मानुसार आपलं काम करा. आपल्या समाजाला एकत्र करा आणि त्याच्या प्रगतीसाठी काम करा हाच धर्म आहे. असे मोठे विचार आणि आदर्शांमुळे अनेक मोठे लोक संत रोहिदास यांचे शिष्य़ झाले," असं मोहन भागवत यांनी सांगितलं. 

मोहन भागवत पुढे म्हणाले की संत रोहिदासांनी समाजाला सत्य, करुणा, आंतरिक शुद्धता आणि सतत परिश्रम आणि प्रयत्न हे चार मंत्र दिले. "आपल्या आजुबाजूला जे घडत आहे तिथे लक्ष ठेवा. पण कोणत्याही परिस्थितीत आपला धर्म सोडू नका. धार्मिक संदेश देण्याची पद्धत वेगळी असली तरी तो संदेश सारखाच असतो. दुसऱ्या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळला पाहिजे"

पंडितांनी समाजात उच्चनीचता निर्माण केली

पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केले नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतला, असं मत यावेळी भागवत यांनी मांडलं.