close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्या; स्वदेशी जागरण मंचाची मागणी

चिनी मालावर निर्बंध घालण्याबरोबरच वस्तूंवरील कर वाढवण्यात यावेत.

Updated: Mar 15, 2019, 07:38 AM IST
चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्या; स्वदेशी जागरण मंचाची मागणी

नवी दिल्ली: भारताने चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्यावा, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचाने केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेला प्रस्ताव चीनने हाणून पाडला होता. चीनच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे भारतात पुन्हा एकदा चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आर्थिक शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वदेशी जागरण मंचाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणला जात आहे. भारताने चीनचा विशेष राष्ट्राचा दर्जा काढून घ्यावा. तसेच चिनी मालावर निर्बंध घालण्याबरोबरच वस्तूंवरील कर वाढवण्यात यावेत. याशिवाय, राजनैतिक आणि आर्थिक अशा प्रत्येक स्तरावर भारताने कडक पावले उचलावीत. जेणेकरून संयुक्त राष्ट्रसंघात घेतलेल्या भूमिकेचे परिणाम चीनला जाणवतील, असे स्वदेशी जागरण मंचाने म्हटले आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद संघटनेने आत्मघातकी दहशतवाद्याचा व्हीडिओ प्रसिद्ध करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने  फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांच्या साथीने 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा संयुक्त प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीपुढे मांडला होता. 

पुलवामाचा हल्ला अत्यंत भीषण असल्यामुळे अनेक देशांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला होता. यामध्येही चीनचाही समावेश होता. त्यावेळी चीनने दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करू, असेही म्हटले होते. त्यामुळे किमान आतातरी चीन मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली होती.