राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?

राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 6, 2024, 02:30 PM IST
राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते? title=

संसदेत राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या सीटखाली रोकड सापडल्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. या प्रकरणी राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यसभा सभापतींनी स्वत: ही माहिती दिली असून, हे गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही सांगितलं आहे. 

राज्यसभा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अचानकपणे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सर्व सदस्यांच्या निदर्शनास एक घटना आणून दिली. काल रात्री संसदेतील सुरक्षा कर्मचारी तपासणी करत असताना 222 क्रमांकाच्या सीटखाली काही नोटांचं बंडल आढळलं. या नोटा काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडल्याचं सभापतींनी सांगितलं. या नोटा ख-या आहेत की खोट्या आणि नोटा राज्यसभेत कशा आल्या यावर चौकशी करणे गरजेचं असल्याचं सभापतींनी सांगितले आणि चौकशीचे आदेश दिले. 

दरम्यान ही संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी घटला असल्याचं सांगून जे पी नड्डा यांनी काँग्रेस खासदारांवर आरोप केले. तर कांग्रेस खासदार असं कृत्य करणार नसल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.

संसद भवनात काय घेऊन जाऊ शकतो?

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांसाठी स्पष्ट नियम आणि कायदे आहेत. या नियमांमध्ये खासदारांच्या अधिकार आणि कर्तव्यांसोबतच सभागृहाच्या कामकाजाच्या पद्धतीही निश्चित केल्या आहेत. या नियमांनुसार खासदारांना सभागृहात रोख रक्कम घेऊन जाण्याची परवानगी नाही.

खासदार सभागृहात कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकतात?

खासदारांना सदनाच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या वस्तू, जसे की नोटबुक, पेन किंवा विधेयक किंवा चर्चेशी संबंधित कागदपत्रे सभागृहात आणण्याची परवानगी आहे. संसदेचं कामकाज योग्य प्रकारे पुढे जाण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. संसद भवनातील सुरक्षेच्या दृष्टीने, खासदारांना त्यांच्यासोबत फक्त ओळखपत्र आणि इतर वैयक्तिक संरक्षक उपकरणं ठेवण्याची परवानगी आहे. या वस्तू संसद भवनाची सुरक्षा सुनिश्चित करतात आणि कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यास मदत करतात.

सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही अशाच गोष्टी आणण्याची परवानगी खासदारांना असते. याशिवाय त्यांना त्यांच्या वागण्यातही शिस्त पाळावी लागते. कोणत्याही खासदाराने परवानगीशिवाय कोणतीही अनावश्यक गोष्ट सभागृहात आणली तर त्याला ताकीद दिली जाऊ शकते आणि कारवाईही होऊ शकते. खासदारांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी काही वस्तू आणण्याची परवानगी आहे, जसं की औषधं, पाण्याच्या बाटल्या इत्यादी.