सज्जन कुमार झाले, आता कमलनाथ आणि गांधी घराण्याचा नंबर- हरसिमरत कौर

राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.

Updated: Dec 17, 2018, 04:42 PM IST
सज्जन कुमार झाले, आता कमलनाथ आणि गांधी घराण्याचा नंबर- हरसिमरत कौर title=

नवी दिल्ली: १९८४ सालच्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवल्यानंतर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. आज सज्जन कुमारांना शिक्षा झाली, उद्या जगदीश टायटलर, त्यानंतर कमलनाथ यांचाही शीख दंगलीतील सहभाग स्पष्ट होईल. सरतेशेवटी या दंगलीचे सूत्रधार असलेल्या गांधी घराण्यालाही शासन होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया हरसिमरत कौर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. शिरोमणी अकाली दलाची विनंती मान्य करून २०१५ साली शीख दंगलीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन (एसआयटी) केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते. आजचा निर्णय ऐतिहासिक होता. अखेर न्याय झालाच, असे हरसिमरत कौर यांनी म्हटले. 

तर दुसरीकडे आजच्या निकालानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. शीख दंगलप्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नावाचाही समावेश होता. असे असूनही राहुल गांधी यांनी त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. या कृतीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केली. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समाजाविरोधात मोठी दंगल उसळली होती. यावेळी रकाबगंज गुरुद्वाराच्या परिसरात कमलनाथ यांनी जमावाला हिंसेसाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या नानावटी समितीने कमलनाथ यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचा अहवाल दिला होता. 

या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची नियुक्ती करण्याला शीख समुदायाकडून विरोध केला जात होता. भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा यांनी दिल्लीत याविरोधात उपोषणही सुरु केले आहे.