नवी दिल्ली : एकीकडे सरकारी शाळा बंद होत असताना लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा या शाळांना नवी उभारी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पालक आणि विद्यार्थी खासगी शाळेची वाट सोडून आता सरकारी शाळेकडे वळत आहे. आता खासगी शाळेतील अडीच लाख मुलं सरकारी शाळेकडे वळल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांमध्ये सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तर अडीच लाख विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून सरकारी शाळेकडे वळले आहेत. कोरोना काळात खासगी शाळांनी आकारलेल्या अवास्तव फी आणि इतर खर्च यामुळे अनेक पालक त्रस्त झाले होते.
अनेक खासगी शाळांनी फीमध्ये सूट दिली नव्हती. त्यामुळे अनेक पालकही खासगी शाळांच्या व्यवस्थापनावर नाराज आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना आर्थिक अडचणींमुळे पुन्हा एकदा सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राज्यात तब्बल अडीच लाख विद्यार्थी सरकारी शाळेकडे वळले आहेत. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले मी राजकारणात गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कार्यरत आहे. पण माझ्या आधी आलेल्या नेत्यांना सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यात कोणताही रस वाटत नाही.
दिल्लीमध्ये माझा पक्ष आणि मी मिळून सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे उत्तम फळ आम्हाला मिळाले. अनेक सरकारी शाळांकडे आज पालक आणि मुलं स्वत: वळत आहेत. मात्र अजूनही इतर राजकीय नेते सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाहीत.