मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सेबीने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे आता आय़पीओ आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची जोखीम कमी होणार आहे. सेबीने आयपीओ गुंतवणूकदारांना मर्यादा आणि कार्यकाळ निश्चित करणारे नियम जारी केले आहेत. जर तुम्हाला ते नियम माहित नसतील तर, त्याबद्दल जाणून घ्या...
सेबीने आयपीओसाठी सर्वात गरजेचे मानले जाणाऱ्या अँकर गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी 30 दिवसावरून वाढवून 90 दिवस करण्यात आला आहे. तसेच त्यांची पैसे काढण्याची मर्यादा 50 टक्क्यांची करण्यात आली आहे.
IPO मधून निधी उभारणाऱ्या कंपन्या आता केवळ 25 टक्के रक्कम इन ऑरगॅनिक कामासाठी वापरू शकतील. तर 75 टक्के रक्कम व्यवसाय विस्तारासाठी वापर करावी लागेल.
IPO मध्ये 20 टक्के स्टेक असलेल्या प्रवर्तकांसाठी लॉक-इन कालावधी तीन वर्षांवरून 18 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर 20 टक्क्यांपेक्षा जास्त स्टेक असलेल्या प्रवर्तकांसाठी लॉक-इन कालावधी एक वर्षावरून सहा महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
सेबीने विदेशी गुंतवणूकदारांशी संबंधित नियमही बदलले आहेत. आता एफपीओ नोंदणी करताना सामान्य माहितीसह एक विशेष नोंदणी क्रमांक दिला जाईल.
यासह, गुंतवणूकदाराने डुप्लिकेट शेअर्सच्या मागणीनुसार डिमॅट स्वरूपात सिक्युरिटीज जारी केले जाऊ शकतात. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांसाठी व्यवहार सुलभ होतील आणि त्यांची सुरक्षाही वाढेल.