close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणे हेच राहुल गांधींचे मोठे यश- शिवसेना

२३ तारखेला दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल.

Updated: May 21, 2019, 07:26 AM IST
लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणे हेच राहुल गांधींचे मोठे यश- शिवसेना

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल पाहता काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही यावेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणे, हेदेखील राहुल गांधी यांचे मोठे यश मानावे लागेल, असे मत शिवसेनेकडून मांडण्यात आले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मंगळवारी यासंदर्भात भाष्य करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, काँग्रेसने एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नसल्याचे सांगत येत्या २३ तारखेला खरी परिस्थिती समोर येईल, असा दावा केला होता.

एक्झिट पोल म्हणजे ईव्हीएम यंत्रात फेरफार करण्याचा डाव- ममता बॅनर्जी

हाच धागा पकडत शिवसेनेने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. २३ तारखेला ‘ईव्हीएम’ची कुलपे उघडली जातील व दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल. आम्ही स्वतः खात्रीने सांगतो की, नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरेल. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. २०१४ साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा राहुल गांधी यांचे यशच मानावे लागेल, असे शिवसेनेने 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.

एक्झिट पोल चुकीचे, अंतिम निकालांची वाट पाहू- शशी थरुर