राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा

एनडीएमध्ये फूट नाही ?

Updated: Aug 8, 2018, 11:49 AM IST
राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा title=

मुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण एनडीएच्या साथीदारांचं संख्याबळ तरी पूर्णपणे हरिवंश यांच्या पाठिशी उभं राहिल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून हरिवंश यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या अकाली दलचे नरेश गुजराल यांना उमेदवारी देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. पण ऐनवळी उमेदवार बदलण्यात आला. त्यामुळे अकाली दलाच्या खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पण त्याचबरोबर हरिवंश यांना पाठिंबा देण्याचंही कबूल केलं आहे.