नवी दिल्ली: अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांना सोमवारी एक आनंदाची बातमी मिळाली. स्मृती इराणी यांच्या मुलापाठोपाठ मुलीनेही सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये एकूण ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या आहेत. या परीक्षेत स्मृती इराणी यांच्या मुलीला ८२ टक्के मिळाले. स्मृती इराणींच्या मुलीचे नाव जोइश इराणी आहे. काही दिवसांपूर्वीच स्मृती इराणींचा मुलगा जोहर इराणी हादेखील बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तेव्हादेखील इराणी यांनी सोशल मीडियावरून आपला आनंद व्यक्त केला होता.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९९ टक्के लागला. निकालात मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण २.३१ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून संयुक्तरित्या अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत.