केवळ 'या' मुख्यमंत्र्यांना राम मंदिर भुमिपुजनाचे निमंत्रण

 केवळ एकाच मुख्यमंत्र्यांना या भुमिपुजन सोहळ्याचे निमंत्रण

Updated: Jul 28, 2020, 05:25 PM IST
केवळ 'या' मुख्यमंत्र्यांना राम मंदिर भुमिपुजनाचे निमंत्रण title=

नवी दिल्ली : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भुमिपुजनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याचे निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. पण केवळ एकाच मुख्यमंत्र्यांना या भुमिपुजन सोहळ्याचे निमंत्रण गेल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांना याचे निमंत्रण दिले जाणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच निमंत्रण देण्यात आलंय. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया आणि राहुल गांधी यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण नसणार आहे. 

अयोध्येत भुमिपुजनाच्या दिवशीच ५०० कोटींची विकासाच्या योजनेचे लोकार्पण केले जाणार आहे. 

अयोध्येमधील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार आहेत.  यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा देखील तयार करण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राम जन्मभूमिच्या दिशेने  कूच करतील. 

मिळालेल्या माहितीनुसार , भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद (VHP) आणि न्यासाशी संबंधित असतील, शिवाय देशातील ५० नेत्यांचाही समावेश असेल.