Wagh Bakri Chai Turnover: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळं उद्योगजगतासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. छोट्याशा चहाच्या दुकानापासून देसाई यांनी 2000 कोटींची उलाढाल असेलली कंपनीचा डोलारा उभा केला. गुजरात चाय नावाने त्यांनी चहाचे दुकान सुरु केले. यानंतर वाघ बकरी सारखा मोठा ब्रँंड बनवला.
गेल्या आठवड्यात, 15 ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना पाय घसरून ते पडले. त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांच्या मेंदूतून रस्तस्त्राव झाला. त्यांच्यावर शेल्बी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळं त्यांना झायडस रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, काल सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचं निधन झालं.
वाघ बकरी चाय (Wagh Bakri Chai) ही देशातील देशातील तिसरी सर्वात मोठी चहा उत्पादक कंपनी आहे. चार पिढ्यांपासून पराग देसाई यांचे कुटुंब चहा व्यवसायाशी निगडीत आहे. देसाई यांच्या पंजोबा म्हणेज आजोबांचे वडील नारनदास देसाई दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते. यानंतर ते महात्मा गांधींच्या संपर्कात आले. दरम्यान वांशिक भेदभावाचे बळी ठरल्याने ते दक्षिण आफ्रिका सोडून भारतात आले. संपूर्ण कुटुंबासह 1915 मध्ये ते भारतात आले. त्यांनी जुन्या अहमदाबाद आणि कानपूरमध्ये चहाची दुकाने उघडली.
देसाई कुटुंबाचे गुजरात टी डेपो या नावाने दुकान सुरु होते. देसाई यांनी पिढीजात व्यवसायाला ब्रँड बनवले. देसाई यांना चहाचे नाव नोंदवायला दोन ते तीन वर्षे लागली. 1980 पर्यंत खुल्या स्वरुपात वजनानुसार ते चहा पावडर विकत होते. 1980 मध्ये देसाई यांनी पहिल्यांदा पॅक चहाचा व्यवसाय सुरू केला. हा निर्णय खूपच आव्हानात्मक ठरला. एकेकाळी पॅक चहाचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता.
80 च्या दशकात लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव होता. पॅकेज केलेला चहा विकणे सोपे नव्हते. पॅकेजिंगमध्ये खर्चही जास्त होता. पॅकेज केलेला चहा सुरू केल्यानंतर कंपनीची पाच ते सात वर्षे खूप नुकसान झाले. नंतर जम बसला. 2003 पर्यंत वाघ बकरी ब्रँड गुजरातमधील सर्वात मोठा चहा उत्पादक बनला होता. 1980 पर्यंत आणि त्यानंतर, गुजरात चहा डेपोने मोठ्या प्रमाणात आणि 7 किरकोळ दुकानांमधून चहाची विक्री सुरू ठेवली.
पराग देसाई यांनी न्यूयॉर्कमधून एमबीए केल्यानंतर कंपनीला नव्या उंचीवर नेले. 1995 मध्ये देसाई यांनी कंपनीची जबाबदारी हातात घेतली तेव्हा कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपये होती. आज वाघ बकरी चहाचा वार्षिक टर्न ओव्हर 2000 कोटींपेक्षा जास्त आहे. वाघ बकरी चहाची जगभरातील 60 देशांमध्ये निर्यात केली जाते. देशभरात वाघ बकरी टी लाउंज आणि कॅफे देखील आहेत.