नवी दिल्ली : मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कथित मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीसाठी निर्देश देण्याबाबतच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचा समावेश असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या कार्यकर्त्यांनी ठार मारलेल्या दोन भाजप समर्थकांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.
या महिन्याच्या सुरूवातीस, भाजपने आरोप केला होता की मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात आपल्या पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. टीएमसीने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
7 मे रोजी गृह मंत्रालयाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांच्या पथकाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील डायमंड हार्बर परिसराला भेट दिली होती.
2 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध ठिकाणी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.