Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंसाचार उफळलेल्या मणिपूरमधील दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या घटनेत जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं दिसत आहे. जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या तिच्या भावाची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेते यावर व्यक्त होत आहेत. त्यातच आता सुप्रीम कोर्टानेही या घटनेची दखल घेतली आहे.
"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
सुप्रीम कोर्टाने मणिपूरच्या घटनेचा निषेध केला असून, हे फार विचलित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसंच हे फार मोठं घटनात्मक अपयश असल्याची टीका केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 28 जुलैला सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
#WATCH | Manipur is burning. Women are raped, naked, paraded and the PM is keeping quiet and is giving statements outside, says Rajya Sabha LoP Mallikarjun Kharge pic.twitter.com/d2g7skXFMR
— ANI (@ANI) July 20, 2023
सुप्रीम कोर्टाने हे पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचं सांगितलं आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्य सरकारला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असून, काय कारवाई केली याची माहिती सुप्रीम कोर्टाला देण्यास सांगितलं आहे.
"आम्ही कारवाई कऱण्यासाठी सरकारला फार कमी वेळ देत आहोत. जर काहीच कारवाई झाली नाही तर आम्ही कारवाई करु," अशा शब्दांत खंडपीठाने इशारा दिला आहे.
"महिलांना साधन म्हणून वापरणं अजिबात मान्य नाही. दोषींविरोधात कारवाई कऱण्यासाठी सरकारने काय कारवाई केली याची आम्हाला माहिती द्यावी. मीडिया आणि व्हिडीओतून दे दिसत आहे त्यातून घटनात्मक उल्लंघन झाल्याचं दिसत आहे," असं डी वाय चंद्रचूड म्हणाले आहेत.
"आज मी तुमच्यासमोर आलोय, या लोकशाहीच्या मंदिरासमोर उभा असताना माझं हृदय दु:खाने भरलेलं आहे. संतापाने भरलेलं आहे. मणिपूरमधील जी घटनासमोर आली आहे ती कोणत्याही सभ्य समाजासाठी ही लज्जास्पद घटना आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला."पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे सर्व समोर येईलच मात्र ही घटना संपूर्ण देशासाठी लज्जास्पद आहे. 140 कोटी भारतीयांना शरमेनं मान खाली घालावी लागत आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"मी सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करावी. खासकरुन आपल्या मातांच्या आणि बहिणींच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घ्या. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो या देशात कोणत्याही कोणत्या, कोणाचीही सत्ता असलेल्या राज्यात राजकीय वादाच्या पुढे जाऊन विचार करत कायदा आणि सुव्यवस्था कठोर करुन महिलांचा सन्मान जपला पाहिजे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
"मी देशातील नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो की, कोणालाही सोडलं जाणार नाही. देशात पूर्ण शक्तीने एकामागून एक कठोर निर्णय घेतले जातील. मणिपूरमधील मुलींबरोबर जे काही झालं आहे त्याला कधीच माफ करता येणार नाही," असंही म्हटलं आहे.