सूरत : सूरतमध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा मराठी झेंडा फडकला आहे.लिंबायत मतदारसंघात सर्व पक्षांचे उमेदवार मराठाच होते.
सूरतमध्ये खान्देशातील लोकांची संख्या लक्षणीय आहे. एवढंच नाही, खासदार सी आर पाटील देखील मूळचे खान्देशी आहेत.
सूरतमधील, लिंबायत मतदारसंघात भाजपच्या मराठी उमेदवार, संगीता राजेंद्र पाटील विजयी झाल्या आहेत.
लिंबायतमध्ये मराठी मतदारांचा टक्का लक्षणीय आहे. तो लक्षात घेऊनच, भाजप आणि काँग्रेसने मराठी उमेदवारांना तिकीट दिले होते.
संगीता पाटील यांनी, काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला. या ठिकाणी शिवसेनेनेही आपला उमेदवार उतरवला होता. शिवसेनेचे सम्राट पाटील निवडणुकीच्या फडात होते.
मात्र, भाजपच्या संगीता पाटील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी, शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठा विजय साकारला. त्यांना ९३,५८५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्रम वाहिदुल्ला अन्सारी तिसर्या स्थानी राहिले, तर सम्राट पाटील यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांच्या पारड्यात ४,०७५ मते मिळाली.