नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांना ट्विटरवरुन खडेबोल सुनावले आहेत. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून चुकीचे आरोप लावण्यावरुन पाकिस्तानला सुनावलं.
स्वराज यांनी ट्विट करत पाकिस्तानला आरसा दाखवलाय. तसंच कुलभूषण जाधव यांचाही मुद्दा उचलून अझीझ यांना खडे बोल सुनावलेत. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नसण्याला सरताज अजीज कारणीभूत असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.
पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यात भारताला कोणतीही अडचण नसून आनंदच आहे. मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचं स्वराज म्हणाल्यात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नियमात झालेला बदल स्पष्ट करत पाकिस्तानी नागरिकाला उपचारासाठी तात्काळ मेडिकल व्हिसा हवा असेल तर सरताज अझीझ यांच्या पत्राची आवश्यकता असल्याची आठवण करुन दिलीय.