आरबीआयची मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या चार बँकांना मोठा दंड

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  (RBI)चार सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या बँकांना जोरदार दणका देताना मोठा दंड आकारला आहे.  

Updated: Jun 30, 2021, 06:44 AM IST
आरबीआयची मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या चार बँकांना मोठा दंड title=
संग्रहित छाया

मुंबई : Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  (RBI)चार सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या बँकांना जोरदार दणका देताना मोठा दंड आकारला आहे. काही नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणामुळे चार बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँक, अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक, एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँक अशा बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन बँका मुंबईच्या आहेत. (The Reserve Bank of India (RBI) has imposed heavy fines on four cooperative banks)

कोणत्या बँकेवर किती दंड?

हैदराबादस्थित आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँकेला आरबीआयने मंगळवारी 112.50 लाखांचा दंड ठोठावला. याशिवाय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अहमदाबाद मर्केंटाईल सहकारी बँकेला  62.50 लाख, मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेला.  37.50 लाख रुपये आणि मुंबईच्या सारस्वत सहकारी बँकेला 25 लाख रुपये  दंड ठोठावण्यात आला आहे.

या कारणासाठी दंड

केंद्रीय बँकेच्या म्हणण्यानुसार, 'ठेवीवरील व्याज दर' आणि 'तुमचा ग्राहक जाणून घ्या' संबंधित आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्यास आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँकेला हा दंड आकारण्यात आला आहे. तर अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 'ठेवीवरील व्याजदराच्या' मास्टर निर्देशात मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

'ठेवीवरील व्याज दर' आणि 'फसवणूक मॉनिटरींग आणि रिपोर्टिंग मॅकेनिझम' च्या निर्देशांचे पालन न केल्यास एसव्हीसी सहकारी बँकेला दंड आकारण्यात आला असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. दुसरीकडे, 'ठेवीवरील व्याज दर' आणि 'ठेव खाती देखभाल' यावरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल सारस्वत सहकारी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयकडून हे स्पष्टीकरण

बँकांना लादलेल्या दंडासंदर्भात आरबीआयने सांगितले की नियामक पालनातील कमतरतेच्या आधारे हा दंड आकारण्यात आला आहे.