IPL Auction 2025 Viral Post On Sanjiv Goenka: इंडियन प्रिमिअर लिग 2025 साठीचा लिलाव पार पडून जवळपास एक आठवडा उलटत आला आहे. या महा लिलावामध्ये म्हणजेच मेगा ऑक्शनमध्ये अनेक फेरफार पाहायला मिळाले. विशेष म्हणजे रिटेंन्शनमध्ये अनेक तगडे खेळाडू स्वइच्छेने संघापासून वेगळे झाल्याने ते सुद्धा लिलावामध्ये होते. यापैकी सर्वात मोठ्या खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे फार जास्त मानधन मिळालं. यात प्रामुख्याने ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुलसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल 27 कोटींची विक्रमी बोली लावली. तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने के. एल. राहुलला 14 कोटींना करारबद्ध केलं. पंजाब किंग्जने 26.75 कोटींना संघात स्थान दिलेला श्रेयस अय्यर दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. असं असतानाच आता या खरेदीवर एका संघ मालकाच्या थोरल्या भावाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये ऋषभ पंत आणि के. एल. राहुल या दोघांनी आपआपसात संघ बदलल्याप्रमाणे परिस्थिती दिसत आहे. म्हणजे मागील 8 वर्षांपासून दिल्लीसाठी खेळणार पंत आता लखनऊच्या संघात गेला तर लखनऊकडून खेळणारा के. एल. राहुल आता दिल्लीकडून खेळणार आहे. त्यामुळे हे खेळाडू स्वाइप केल्यासारखं झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल होत असून या फोटोमध्ये के. एल. राहुल हा पंतच्या गळ्यात हात घालून काहीतरी सांगताना दिसतोय. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने लखनऊचे संघ मालक असलेल्या संजीव गोयंका यांच्या थोरल्या भावाचंही लक्ष वेधलं आहे.
के. एल. राहुल हा ऋषभ पंतला संजीव गोयंकाबद्दल सल्ला देत असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. @sagarcasm या हॅण्डलवरुन के. एल. राहुल आणि पंतचा जुना फोटो पोस्ट करताना त्याला, "हे बघ भावा, कंपनी चांगली आहे, पगार चांगला आहे मात्र बॉस फार टॉक्सिक आहे," असं म्हटलं आहे. म्हणजेच के. एल. राहुल पंतला संजीव गोयंकांपासून जपून राहण्याचा सल्ला देत असल्याचं या पोस्टमध्ये अधोरेखित करायचं आहे.
नक्की वाचा >> 27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्क
आयपीएल 2024 च्या पर्वात लखनऊचा संघ सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून पराभूत झाल्यानंतर मैदानातच संजीव गोयंका आणि के. एल. राहुलदरम्यान झालेल्या कथित बाचाबाचीचा संदर्भ या पोस्टला आहे. संजीव गोयंका यांनी यावर नंतर स्पष्टीकरण देताना, "मी शक्यतांवर भाष्य करणार नाही, मी एवढं सांगेन की के. एल. राहुल हा माझ्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे आहे," असं म्हटलं होतं.
Dekh Bhai, company achi hai, pay acha hai, par boss bohot toxic hai pic.twitter.com/qgVvoi71Fm
— Sagar (@sagarcasm) November 24, 2024
आता पंतला संजीव गोयंकांनी विकत घेतल्यानंतर के. एल. राहुल पंतला त्यांच्यापासून जपून राहायला सांगत असल्याच्या या पोस्टवर संजीव यांचे ज्येष्ठ बंधू आणि उद्योजक हर्ष गोयंका यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. छोट्या भावाला टॉक्सिक बॉस म्हणणाऱ्या या पोस्टवर हर्ष यांनी गोंधळून विचार करणारा इमोजी पोस्ट केला आहे.
दरम्यान, पंतला 27 कोटींना खरेदी केल्यानंतर संजीव गोयंका यांनी, "आम्ही त्याच्यासाठी 25 ते 27 कोटी बाजूला काढून ठेवले होते. तो आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आणि आम्हाला गरज होती तसाच खेळाडू आहे. आम्ही काहीही करुन त्याला विकत घेणारच होतो," असं सांगितलं.