मुंबई : 2021 या वर्षाचं हे पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) 26 मे रोजी दिसणार आहे. मात्र ही खास गोष्ट असणार आहे की, एकाचवेळी हे सुपरमून (Supermoon) 2021), चंद्र ग्रहण (Lunar eclipse 2021) आणि ब्लड मून (Blood Moon) असणार आहे.
काय असतं सुपरमून (Supermoon) ?
पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना चंद्र याकाळात पृथ्वीच्या अतिशय जवळ येते. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात अतिशय कमी अंतर असते. चंद्र आणि पृथ्वी यामध्ये यावेळी 28,000 मैल एवढे अंतर असते. यामध्ये सुपरचा अर्थ असा आहे की? चंद्र जवळ आल्याने त्याचा आकार मोठा आणि चमचमता दिसतो. तसेच सुपरमून आणि सामान्य चंद्र यांच्यातील फरक समजून घेणं फार कठीण आहे.
चंद्रग्रहणाचा अर्थ काय?
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही.
26 मे 2021 रोजी दिसणारं चंद्रग्रहण हे प्रशांत महासागराच्या मध्य, ऑस्ट्रेलिया, एशियाचा पूर्व भाग आणि अमेरिकेच्या पश्चिमी भागापासून दिसणार आहे.
भारतातील दक्षिण पूर्व भागात, पश्चिम बंगालमधील काही भागात आणि ओडिसाच्या काही भागात आणि अंदमान-निकोबार येथे थोड्या काळासाठी दिसणार आहे.
ग्रहणाची पार्शियल फेज ही दुपारी 3 वाजता सुरू होणार असून ती संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी संपणार आहे. तर संपूर्ण चरण हे संध्याकाळी 4.39 ला सुरू होऊन 4.58 ला संपणार आहे. IMD नुसार हे चंद्रग्रहण संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटे ते 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत भारतात जास्त काळ असणार आहे.