True Friendship : बीटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या स्विटी नावाची एक मुलगी रस्ते अपघातात (Accident) गंभीर जखमी झोली होती. आता स्विटीची प्रकृती स्थिरावतेय. याचं श्रेय जितकं डॉक्टरांना जातं तितकच तिच्या मित्र-मैत्रिणीनांही जातं. इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या आठ मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपने स्विटीच्या उपचासाठी दिवस-रात्र एक केला पण स्विटीच्या उपचारासाठी कुठेही पैसे कमी पडू दिले नाहीत. परीक्षेचा अभ्यास सोडून या मित्रांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांच्या मदतीने आर्थिक मदतीची विनंती केली. यानंतर अवघ्या 10 दिवसात या मित्रांनी तब्बल 40 लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे यातल्या 11 लाखांची मदत पोलीस विभागाने केली. सध्या स्विटी शुद्धीत आली असून तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. (friends raised rupees 40 lakhs in 10 days)
ज्या दिवशी स्विटीचा अपघात झाला, त्याच दिवसापासून परीक्षेला सुरुवात झाली. पण परीक्षेपेक्षा आम्हाला स्विटीच्या तब्येतीची जास्त काळजी होती, असं तिचे मित्र सांगतात. परीक्षा नंतरही देता येईल, पण स्विटीच्या उपचारात कोणतीही कमतरता नको या विचाराने 8 मित्र-मैत्रिणींचा ग्रुप एकत्र आला. स्विटी त्यांची क्लासमेट आहे आणि आपल्या मैत्रीचं कर्तव्य पार पाडण्यासाठी या सर्वांनी पुढाकार घेतला.
स्विटी रस्ते अपघातात गंभीर जखमी
उत्तर प्रदेशमधल्या नोएडातल्या सेक्टर डेल्टा टू जवळ स्विटीचा अपघात झाला. गंभीर अवस्थेतच तिला कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पैशांअभावी तिच्यावर उपचार करणं शक्य नव्हतं. स्विटीच्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज होती. लाडकी लेक गंभीर जखमी आणि त्यातच उपचारासाठी लाखो रुपयांची गरज अशा दुहेरी संकटात तिचे वडिले होते. पण अशा वेळी स्विटीचे मित्र धावून आले. आशीर्वीद, मणी त्रिपाठी, करण पांडे, आदर्श सिंह, राज श्रीवास्तव, अनुभव यादव, राजमणी, चंदहन सिंह, शुभम आणि प्रतिक अशी या मित्रांची नाव. त्यांनी स्विटीच्या वडिलांना भेटून त्यांना उपचारात पैशांची कमतरता पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं.
उपचारासाठी लाखो रुपयांची गरज
अपघातात स्विटी गंभीर जखमी झाली होती. तिच्या इलाजासाठी रुग्णालयाने जवळपास 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं. इतकी मोठी रक्कम कशी उभारयची या पेचात असतानाच सर्व मित्रांनी सोशल मीडियावर मदतीची विनंती केली. सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप, ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामसहित इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्विटीचे फोटो आणि तिच्या वडिलांचं बँक अकाऊंट नंबर व्हायरल केला.
मित्रांच्या विनंतीला साथ देत मदतीचे हजारो हात पुढे सरसावले. अगदी 10 रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत मदतीचा ओघ सुरु झाला. अवघ्या 10 दिवसात देशभरातून स्विटीच्या वडिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 29 लाख रुपये जमा झाले. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी पोलीस विभागातर्फे दहा लाख आणि स्वत:कडून 1 लाख अशी 11 लाखांची मदत केली.
डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, मित्रांचं प्रेम आणि मदतीच्या हजारो हातांमुळे स्विटीच्या प्रकृती मोठी सुधारणा झाली आहे.