नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून अमेरिकेच्या ७ राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली. पण अमेरिकेच्या दृष्टीनं भारताचं महत्व गेल्या २० वर्षांमध्ये जास्तच वाढलं आहे. गेल्या २० वर्षात प्रत्येक राष्ट्राध्यक्षानं भारताला भेट दिली आहे.
जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. दक्षिण पूर्व आशियातल्या इतर देशांमध्ये अस्थिर राजवट असताना भारतात मात्र लोकशाहीनं मूळ धरलं आणि ती रुजलीही. लोकशाहीला मानणाऱ्या भारताकडं अमेरिकेला फार काळ दुर्लक्ष करता आलं नाही.
स्वातंत्र्यानंतर १३ वर्षांची प्रतीक्षा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १३ वर्षांनी १९५९ मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर भारत भेटीवर आले. त्यावेळी अलिप्तवादी चळवळ जोमात होती. नेहरु या चळवळीचे नेतृत्व करत होते. नेहरु आणि आयसेन हॉवर यांच्यात त्यावेळी चर्चा झाली होती.
१० वर्षांनी दुसरी भेट
त्यानंतर थेट १० वर्षांनी १९६९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन भारत भेटीवर आले. त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. पाकिस्तानशी अमेरिकेची खूपच घट्ट मैत्री होती. आणि चीनलाही अमेरिकेनं चुचकारायला सुरुवात केली होती.
भारताने दबाव फेटळाला
या भेटीनंतर तब्बल ९ वर्षानंतर जिमी कार्टर १९७८ मध्ये भारत भेटीवर आले. त्यावेळी भारतानं अण्वस्त्रनिर्मिती करु नये असा दबाव भारतावर आणण्यात आला. पण भारतानं तो फेटाळला. त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला भारतात येण्यासाठी तब्बल २२ वर्षें लागली.
२२ वर्षांचा विलंब
२२ वर्षानंतर २००० साली बिल क्लिंटन हे भारत भेटीवर आले. कारगिल युद्धात त्यांनी पाकिस्तानला घुसखोरांना माघारी बोलवायला सांगितलं होतं. अमेरिकेचा दृष्टीकोन बदलतोय हे सांगण्यासाठी हा निर्णय पुरेसा होता. बिल क्लिंटन यांच्यानंतर प्रत्येक अमेरिकी राष्ट्राध्यक्षानं न चुकता भारत दौरा केला.
भारत-अमेरिका अणू करार
२००६ मध्ये जॉर्ज डब्लू बुश यांनी भारताला भेट दिली. त्यांच्याच काळात भारत- अमेरिका अणुकरार झाला.
ओबामांचा पहिलाच भारत दौरा
२०१० मध्ये बराक ओबामा यांनी भारताला भेट दिली. त्यावेळी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावं अशी भूमिका अमेरिकेनं मांडली. त्यावेळी व्यापार आणि संरक्षणविषयक विषयांवर द्विपक्षीय चर्चा आणि करार झाले.
ओबामा पुन्हा भारतात
२०१५ मध्ये ओबामा जेव्हा पुन्हा भारत भेटीवर आले तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. भारत आणि अमेरिका मैत्री घट्ट झाली हे सांगण्यासाठी ती भेट पुरेशी होती.
सुरुवातीच्या ५३ वर्षांत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फक्त तीन दौरे आणि २००० पासून प्रत्येक राष्ट्राध्यक्षानं भारताला दिलेली भेट, हे भारताचं वाढलेलं महत्व अधोरेखित करतेय.