नवी दिल्ली : Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना NDAसोबत येण्याचे आवाहन केले आहे. कारण शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज आहेत, असे ते म्हणाले.
दीपक केसरकर हे एनडीएच्या (NDA) बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहेत. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की एनडीए मध्ये यावे. 80 टक्के खासदार नाराज आहेत. खासदार हिंदुत्वाचा मार्ग सोडणार नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत आले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. राऊत हे शरीराने शिवसेनेत पण मनाने राष्ट्रवादीत आहेत. पवारसाहेब म्हणतात दोन पण आमदार निवडून येणार नाही. पण त्यांनी भूतकाळात रमून चालणार नाही, असे त्यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.
आम्ही एका विचाराने पुढे जात आहोत. हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आम्ही लढवणार आहोत, असे दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे भविष्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमने-सामने दिसणार आहेत.