देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन

Union Budget 2022 :​देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली.  

Updated: Feb 1, 2022, 12:09 PM IST
देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन title=
Pic / ANI

नवी दिल्ली : Union Budget 2022 :देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प आहे. यावेळी रस्ते विकासाला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती संसदेत अर्थमंत्र्यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. गतवर्षी त्यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. दरम्यान अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये उत्साह पहायला मिळाला. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पावर स्वाक्षरी केली.
 
देशात 25 हजार किलो मीटर रस्त्याचे जाळे उभे करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-2023 साठी हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.  देशातील डोंगराळ भागात रस्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. रस्ता विस्तारण्यासाठी  ‘पर्वतमाला’ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. हे उपक्रम पीपीपी अर्थात खासगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या तत्वावर राबवले जाणार आहेत.

तसेच मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार आहेत. रेल्वेचे जाळे विकसित करणार आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.