केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Updated: Nov 12, 2018, 08:52 AM IST
केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बंगळूरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

कुमार यांच्यावर लंडन आणि न्यूयॉर्क येथे उपचार सुरु होते. पण, काही दिवसांपूर्वीच ते मायदेशी परतल्यानंतर बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

कुमार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बंगळुरूच्या नॅशनल कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे. 

मोदी सरकारमध्ये २०१४ पासून कुमार यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालयाचा पदभार होता. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा मंत्री निर्मला सितारामन आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं. 

कुमार यांच्या कामाविषयी माहिती देत मोदींनी त्यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं. तर इतर मंत्र्यांनीही या प्रसंगी आपण कुमार यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं सांगितलं.