आदर्श सून हवीय; मग 'या' विद्यापीठातील मुलीचा विचार करा

कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या वधू घडवणार आहोत.

Updated: Sep 15, 2018, 03:22 PM IST
आदर्श सून हवीय; मग 'या' विद्यापीठातील मुलीचा विचार करा title=

भोपाळ: आपल्या मुलाला किंवा मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी पालक मंडळी बरेच खटाटोपही करतात. मात्र, भोपाळमधील एका विद्यापीठामुळे तुर्तास मुलांच्या पालकांची चिंता दूर होण्याची शक्यता आहे. बरकतउल्लाह विद्यापीठाने 'आदर्श सून' हा नवा कोर्स सुरु केला आहे. यामुळे मुलींच्या सबलीकरणाला चालना मिळेल, असा विद्यापीठाचा दावा आहे. त्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्याची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, अनेक जणांकडून या अभ्यासक्रमावर टीकाही केली जात आहे. 

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमामुळे लग्नानंतर मुलींना नव्या घरात रुळण्यास मदत होईल, असे विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी.सी. गुप्ता यांनी सांगितले. शैक्षणिक संस्था म्हणून समाजाविषयी आमचे काही दायित्व आहे. त्यामुळे आम्ही फक्त शिक्षणावर भर न देता कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या वधू घडवणार आहोत, असे डी.सी. गुप्ता यांनी म्हटले. 

विद्यापीठातील मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि महिला शिक्षण विभागाकडून प्रायोगिक तत्वावर हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल. अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीत ३० मुलींना प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी अजून कोणतेही निकष निश्चित करण्यात आलेले नाहीत. मात्र, पालकांशी चर्चा करुन आम्ही या सगळ्याचे स्वरुप निश्चित करु, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.