जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकारच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांचा चेक देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांच्या घरी 25-25 लाखांचे दोन चेक घेऊन पोहोचले होते. यादरम्यान मुलाच्या निधनाने व्यथित झालेल्या आईचा आक्रोश सुरु होतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आग्रा येथील निवास्थानी पोहोचले होते. यावेळी शुभम गुप्ता यांच्या आईचा आक्रोश सुरु असतानाच योगेंद्र उपाध्याय यांनी त्यांच्या हातात योगी सरकारने दिलेला 50 लाखांचा चेक सोपवला. घराच्या दरवाजातच लोकांनी योगेंद्र उपाध्याय यांच्या हातून वयस्कर आईच्या हाती चेक दिला.
यादरम्यान मंत्री महोदयांसह फोटो काढणारेही पोहोचले होते. हे पाहिल्यानंतर शहीद शुभम गुप्ता यांच्या आईचा संताप झाला. येथे प्रदर्शन सुरु करु नका असं त्या यावेळी म्हणाल्या.
मुलाच्या निधनाने पूर्णपणे कोसळलेल्या आईला काहीच कळत नव्हतं. त्या वारंवार आपल्या मुलाला परत बोलवून आणा अशी आर्त विनंती करत होत्या. हे चित्र पाहिल्यानंतर तिथे उपस्थित सर्वजण निशब्द झाले होते. पण कॅबिनेट मंत्री फोटो काढण्यातच व्यग्र होते.
समाजवादी पक्षाने संताप व्यक्त करत भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. "भाजपावाल्यांच्या असंवेदनशीलतेवर एक आई म्हणाली 'इथे प्रदर्शन भरवू नका'. भाजपा सरकारचे मंत्री शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबाला चेक देण्याच्या नावे फोटोशूट करत आहेत. त्या आईचा आणि अश्रूंचा हा अपमान आहे. शहिदांच्या नावे राजकारण करणारं भाजपा अद्याप वठणीवर आलेलं नाही. हे लाजिरवाणं आहे. शहिदाच्या कुटुंबाचा अपमान केल्याप्रकरणी मंत्र्याने माफी मागावी," अशी पोस्ट समाजवादी पक्षाने शेअर केली आहे.
भाजपाइयों की असंवेदनशीलता पर बोली एक माँ 'ये प्रदर्शनी मत लगाओ भाई' !
भाजपा सरकार के मंत्री कल ही शहीद हुए आगरा के कैप्टन शुभम गुप्ता के परिवार को चेक देने के नाम पर करा रहें फोटोशूट, बिलखती माँ के आंसुओं का अपमान।
शहीदों के नाम पर भी राजनीति करने से बाज नहीं आये भाजपा वाले,… pic.twitter.com/ufPY2XDfRZ
— Samajwadi Party (@samajwadiparty) November 24, 2023
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "प्रदर्शन भरवू नका, एक आई विनंती करत असतानाही मंत्री मात्र फोटो सेशन करत राहिले. हा काय लाजिरवाणा प्रकार आहे. शहिदाच्या कुटुंबाला शांततेत शोकही करु देणार नाही का?".
‘प्रदर्शनी न लगाओ’ the mother is pleading while inconsolable yet the minister continues with his photo op. What shamelessness is this? Won’t even allow the martyr family to grieve in peace minus the cameras. Heartless. https://t.co/UmsbN93aLA
तसंच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी व्हिडीओ एक्सवर शेअर करत म्हटलं आहे की, "भाजपात बी चा अर्थ बेशर्म आणि पी चा अर्थ पब्लिसिटी असला पाहिजे. शहीद कॅप्टनची आई आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत असताना युपी सरकारमधील भाजपा मंत्री योगेंद्र उपाध्याय निलाजरेपणाने पीआरसाठी एक फोटो काढून अडून बसले आहेत".
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये बुधवारी दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले होते. शहिदांमध्ये कॅप्टन शुभम गुप्ताही आहे. राजौरीत दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं. सर्च ऑपरेशन सुरु असतानाच चकमक झाली आणि चौघे शहीद झाले.