Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन चमकदार कामगिरी केली आहे. मैदानाबाहेरही मोहम्मद शमी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. उत्तर प्रदेशात लहानाचा मोठा झालेला मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच अतिशय नम्र आहे. याचाच प्रत्यय एका अपघाताच्या घटनेनंतर आला आहे. मोहम्मद शमी शनिवारी लेक सिटी नैनितालला पोहोचला होता. मात्र त्याआधी नैनितालपासून काही अंतरावर त्यांच्या कारसमोर एका कारचा अपघात झाला होता. अपघात झाल्याचे पाहून त्यांनी आपली कार थांबवली आणि कारमधील लोकांना वाचवले.
नैनितालला जाताना शमीने रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शमीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो रस्ता अपघातग्रस्तांना मदत करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना शमीने तो खूप भाग्यवान आहे की देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले आहे, असेही म्हटलं आहे. यानंतर हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
वर्ल्डकपनंतर मोहम्मद शमी सुट्टी घालवण्यासाठी आणि भाची यमुना फातिमा आणि चुलत बहीण अमीराला घरी घेऊन जाण्यासाठी नैनितालला गेला होता. शनिवारी तो नैनितालला चालला होता. यावेळी त्याने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नैनितालला जात असताना काही अंतरापूर्वी त्याच्यासमोर कारचा अपघात झाला. गाडी खड्ड्यात पडली होती. गाडीत काही लोक होते. यानंतर क्रिकेटर मोहम्मद शमीने आपली कार थांबवली आणि साथीदारांसह कारमधील लोकांना बाहेर काढले. त्यांनी स्वत: गाडीतील व्यक्तीवर प्राथमिक उपचार केले. व्हिडिओमध्ये तो त्यांच्या हातावर पट्टी बांधताना दिसत आहे.
व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये शमीने, 'एखाद्याला वाचवण्यात मला खूप आनंद होत आहे. एखाद्याची सेवा करण्यात मला खूप आनंद होतो,' असं म्हटलं आहे. यानंतर 31 सेकंदाच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि शेअर करायला सुरुवात केली. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
मोहम्मद शमी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने केवळ सात सामन्यांत 24 विकेट घेतल्या. शमी भारताच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. मात्र, बांगलादेशविरुद्ध अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी झाल्याने शमीला संघात स्थान मिळाले. त्यानंतर प्रत्येक सामन्यात त्याने छाप सोडली.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यापूर्वी मोहम्मद बंगालकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळला होता. मोहम्मद शमीने अलीकडेच त्याच्या आवडीनिवडीबद्दल खुलासा केला. एका युट्यूब चॅनलवर तो बोलत होता. 'मला प्रवास, मासेमारी करायला आवडते. मला ड्रायव्हिंग आवडते. मला बाईक आणि कार चालवायला आवडते. पण भारतासाठी खेळायला लागल्यानंतर मी बाइक चालवणे बंद केले आहे. मी जखमी झालो तर? कधी कधी मी गावात असतो तेव्हा मी हायवेवरून माझी बाईक चालवतो, असे शमी म्हणाला.