'उद्धव ठाकरेंनी रामभक्तांचा विश्वासघात केलाय; अयोध्येत येऊ देणार नाही'

मी स्वत: राजदंड घेऊन उद्धव ठाकरे यांचा रस्ता अडवेन.

Updated: Mar 4, 2020, 08:37 AM IST
'उद्धव ठाकरेंनी रामभक्तांचा विश्वासघात केलाय; अयोध्येत येऊ देणार नाही' title=

लखनऊ: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसशी हातमिळवणी केली. हा रामभक्तांचा विश्वासघात आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही. मी स्वत: राजदंड घेऊन उद्धव ठाकरे यांचा रस्ता अडवेन, असे महंत परमहंस दास यांनी म्हटले. 

एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या नव्हे तर मक्केला जावे, असा टोलाही महंत परमहंस दास यांनी उद्धव यांना लगावला. हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू राष्ट्रासाठी शिवसेनेची स्थापना केली. कारण, जगात हिंदुंचा स्वत:चा असा देश नाही. त्यामुळे भारताला हिंदूराष्ट्र करणे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांचा अपमान केला आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्यामागे राजकीय गणिते आहेत. मात्र, त्यांना अयोध्येत येण्याची गरज नाही, असे महंत परमहंस दास यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकारला येत्या ७ तारखेला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीच्या तीरावर आरतीही करणार आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश काढण्याची मागणी करत उद्धव यांनी भाजपासमोर आव्हान उभे केले होते. यानंतर आता भाजपशी युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जात असल्याने या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.