Weather Update: सावधान! 'या' राज्यांमध्ये उष्णतेचा कहर, हवामान विभागाकडून इशारा

Weather Update : देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीत अभूतपूर्व उष्मा आणि मार्चमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.आता हवामान विभागाने (IMD) एप्रिलसाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 6, 2023, 10:08 AM IST
Weather Update: सावधान! 'या' राज्यांमध्ये उष्णतेचा कहर, हवामान विभागाकडून इशारा title=

Weather Update : देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस पडल्यानंतर आता तापमानाचा पारा चांगलाच वाढणार आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. उष्णतेचा कहर जाणवणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फेब्रुवारीत अभूतपूर्व उष्मा आणि मार्चमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता हवामान विभागाने (IMD) एप्रिलसाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे.

काही ठिकाणी पावसाचा अंदाज 

 दिल्ली, उत्तर प्रदेशआणि उत्तराखंडामध्ये अनपेक्षित हवामान बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतातील काही भागात काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. पावसामुळे सकाळ-संध्याकाळ तापमानाचा पारा घसरल्याने थोडी थंडी जाणवत आहे. तसेच दुपारनंतर अनेक भागात गारवा जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने आपल्या ताज्या अपडेटमध्ये सांगितले आहे की तापमान वाढ होईल. त्याचवेळी काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उष्णतेचा कहर जाणवेल. एप्रिलमध्येच मे-जूनप्रमाणेच उन्हाचा तडाखा जाणवणार आहे. अशा स्थितीत उत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.  दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्ये पारा वाढल्याने उष्णतेचा त्रास जाणवायला सुरुवात होईल.

तापमानाचा पारा चांगलाच वाढू शकतो

उत्तर पश्चिम भारतात मैदानी भागात तापमान वाढणार आहे. 11 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरच्या तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, बहुतेक भागांमध्ये तीव्र उष्णतेचा कहर दिसून येईल. आज एप्रिलपासून दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानातील बदल पूर्णपणे दिसून येईल. दुसरीकडे, 6 ते 8 एप्रिल दरम्यान पश्चिम भारतातील हवामानात बदल होताना दिसून येईल. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस 

विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीचे हवामान स्वच्छ होईल. शुक्रवारीही हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. आज दिल्लीत किमान तापमान 16 अंश आणि कमाल तापमान 33 अंश असू शकते. 

राजस्थानमध्ये उष्णतेची लाट  

राजस्थानमध्ये 8 एप्रिलपासून तापमान वाढण्यास सुरुवात होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे 14-15 एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. तसेच या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पश्चिम राजस्थानच्या भागात उष्णतेची लाट येईल. त्यामुळे लोक उष्णतेचा सामना करण्याबरोबरच लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.