कोलकाता : पश्चिम एसटीएफनं (Special Task Force) कोलकाताच्या सियालदाहच्या रेल्वे स्टेशनहून 'आयएसआयएस'च्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक केलीय. यातील तीन जण बांग्लादेशचे नागरिक आहेत. तसंच चौथा संशयित आरोपी भारतीय असून इतर तिघांना लपवण्याचं काम तो करत होता. या चारही संशयित दहशतवाद्यांचं काम दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'साठी तरुणांना भर्ती करणं आणि पैसा मिळवणं असल्याचं सांगण्यात येतंय. दहशतवादाचा अजेंडा राबवण्यासाठी हे आरोपी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचंही समोर आलंय. पोलिसांना त्यांच्याकडे अनेक डिजिटल डॉक्युमेंटसही सापडले आहेत. यात अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्ससोबतच अनेक जिहादी बुकलेटसही सापडली आहेत.
या संघटनेचा मुख्य उद्देश भारत आणि बांग्लादेशमध्ये लोकतांत्रिक सरकारला धक्के देणं आणि शरिया कायदा लागू करणं असल्याचंही सांगण्यात येतंय. कोलकाता पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२४ जून) एसटीएफनं पुराव्यांसहीत दोन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. हे दोघेही 'जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश' (Neo-JBM) इस्लामिक स्टेटचे सदस्य आहेत.
सियालदाह रेल्वे स्टेशनच्या पार्किंग भागातून या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वेगवेगळी आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली. सोमवारी अटक करण्यात आलेल्या दोघांची कसून चौकशी केली असता आणखीन दोघांची नावं समोर आली. त्या आधारावर एसटीएफनं आज (मंगळवारी) आणखी दोघांना हावडा भागातून अटक केलीय.