Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिंदे- फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकार महाराष्ट्रात सत्तेत राहणार, की त्यांना सत्ता सोडावी लागणार? शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूनं हा निकाल लागणार का? या आणि अशा अनेक चर्चा आणि प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीतून मिळणार आहेत. साधारण 10 महिन्यांपासून सत्तासंघर्षाटच्या निकालासाठी तारखांवर तारखा मिळत असतानाच आता नेमकी 11 मे 2023 हीच तारीख निवडण्यात का आली? हा प्रश्नही काहींना पडला. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणंही तितकंच खास आणि महत्त्वाचं आहे.
सर्वोच्च न्यायालयात पाच घटनापीठांच्या एकमतानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देण्यात येणार आहे. या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, जस्टीस कृष्ण मुरारी, जस्टीस शाह, जस्टीस हिमा कोहली, जस्टीस नरसिम्हा यांचा समावेश आहे.
सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठीच्या या घटनापीठातील न्या. एम. आर. शाह 15 मे 2023 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच हा निर्णय लागणं अपेक्षित होतं. त्यातही सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवसांना घटनापीठ सहसा कामकाज घेत नसल्यामुळं मंगळवार, बुधावार, गुरुवार याच दिवासांना सुनावणी होते. त्यातच 8 ते 13 मे 2023 दरम्यान शनिवार-रविवार या दिवसांना न्यायालयाला रजा असते. परिणामी न्यायालयाकडून गुरुवार हा दिवस सुनावणीसाठी निवडण्यात आला.
गुरुवारचा दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा असेल. कारण, या दिवशी दिल्ली सरकार- नायब राज्यपाल यांच्या अधिकार कक्षा आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालांचं वाचन होणार असून, त्यानंतर समलैंगिक विवाहावरील सुनावणीही पार पडणार आहे.